Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या तापमानात आज (९ नोव्हेंबर) रोजी मोठ्या प्रमाणात चढ- उतार पाहायला मिळणार आहे. कुठे तापमानात मोठी घट होईल तर कुठे तापमान वाढलेले दिसेल.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईसह राज्यात पहाटेच्या वेळी गारवा जाणवत आहे. तर दिवसभर उकाडा जाणवतो आहे.
पहाटे थंड वारे वाहात असल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. पुण्यात देखील सकाळी थंड वारे वाहत असून धुके पडत आहे. राज्यात, सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
राज्यात दिवाळी नंतर तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा सर्वाधिक खाली आला आहे.
राज्यात काही जिल्ह्यात रात्री कडाक्याची थंडी जाणवत असून या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता शेकोट्यांचा आधार घेत आहे. तर स्वेटर, गरम कपडे देखील कपाटातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा तडाखा जाणवतो. तर विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात देखील थंडी जाणवत आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दिवाळीनंतर पुण्याच्या तापमानात देखील घट झाली आहे. पुण्यात दोन अंशांनी तापमानात घट झाली आहे.
पुढील काही तासांत तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या शहरात सकाळी, सायंकाळी व रात्री थंडी पडत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. ८ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* संत्रा आणि मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
* सध्या रात्री व दिवसाच्या तापमानात फरक पडतो आहे. रात्री १५ अं.से. व दिवसा ३० अं.से. च्या वर जात आहे. याच काळात रेशीम शेतकऱ्यांनी फांद्या खाद्य पध्दत देताना रॅकवर ब्लू पॉलीथीन अच्छादन (किंवा निळी जाळी) करावे, म्हणजे दुपारी पाने सुकणार नाहीत, दुपारच्या वेळी आर्द्रता कमी होणार नाही, पाने ताजे राहतील, याची काळजी घ्यावी.
* तिसऱ्या व चौथ्या कातीवर बसताना पांढऱ्या चुन्याची धुरळणी करावी. कातेवरून उठताना निर्जंतुक पावडर विजेता किंवा अंकुशची धुरळणी ४.५ कि.ग्रॅ./ १०० अंडीपुजप्रमाणे अर्धा तास अगोदर करून नंतर फांद्या खाद्य द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.