येत्या ४८ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सप्टेंबर महिना सुरु होताच राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, गुजरातपासून केरळपर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. देशभरात सक्रिय असणाऱ्या याच हवामानाचा थेट परिणाम मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दिसून येत आहे.
कोकणाच्या तुलनेत इथे पुढील ४८ तासांमध्ये अधिक पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात जोरदार बरसणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर ओसरला असला तरी मराठवाड्यात मात्र पावसाचा चांगलाच खेळ रंगताना दिसतोय. तर धुळ्यात पावसाचा जोर कायम आहे. लोक वस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर राज्यात मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. काढणीला आलेली पिके ही काढून घेऊन सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.