Join us

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, कसा असेल पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:35 AM

राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच पुणे (घाटमाथा), विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

तर नगर, नाशिक मराठवाड्यातील जालना, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' आहे.

कोकण आणि विदर्भामध्ये शनिवारी (दि.२०) पावसाचा जोर अधिक असणार आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला 'रेड अलर्ट' आहे, तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, नाशिक, धुळे आणि जळगाव, संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. तर सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुणा, मंडला, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत तो पट्टा सक्रिय आहे. तसेच महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांना जोडणारे क्षेत्र देखील सक्रिय आहे.

घाटमाथ्यावर जोरदार गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. लोणावळामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १३५ मिमी पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाटात १६८ मिमी, तर डुंगुरवाडीमध्ये १३३ मिमी पाऊस झाला. धरणक्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस होत आहे. कोयनामध्ये ११४ मिमी, राधानगरी १६३ मिमी, कासारी१०५ मिमी, पाटगाव ३०० मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :पाऊसहवामानमहाराष्ट्रविदर्भकोकणमराठवाडामुंबई