पुणे : सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस होत आहे. सोमवारी (दि. २२) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यामध्ये हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ओरिसा आणि छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू कमी होत आहे. मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.
कोकण, विदर्भासह सध्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. रविवारी (दि. २१) महाबळेश्वरला १४१ मिमी पावसाची नोंद झाली. तर कोल्हापूर ४१ मिमी, मुंबई ४० मिमी, सांताक्रूज १४० मिमी, रत्नागिरी ६२ मिमी आणि डहाणूमध्ये १३८ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबई परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर विदर्भात काही भागात तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
पुढील तीन दिवसांचा अंदाज ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा.यलो अलर्ट: मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर.