पुणे : सलग तीन दिवस सायंकाळी पुण्यात पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस पावसाचे असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला.
पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे. बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने सोमवारी (दि. १९) राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला होता तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारी (दि. २१) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.