मुंबई : मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी बरसणारा, तर काही ठिकाणी पूर्णतः उघडीप घेतलेला मान्सून आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
तसेच राज्याच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, यानुसार चांगला पाऊस पडला, तर उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
त्यानुसार, राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची स्थिती सुधारेल. शिवाय पावसात हळूहळू वाढ होईल. शिवाय जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
२४, २५ ला मुंबईत काय होणार?
२४ आणि २५ जून रोजी शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली.