पुणे : राज्यामध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये देशातून निरोप घेईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुणे शहरातील कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, दुपारी ऊनदेखील वाढत आहे. सोमवारी (दि.१४) तर दमट वातावरण असल्याने अंगाची लाहीलाही झाली.
सध्या मान्सूनने सोमवारी बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातून माघार घेतली, तर मान्सून उत्तर आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागातून माघारी फिरला आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या उरलेल्या भागातून आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी फिरेल.
हवामान विभागाने मंगळवारी दि.१५ कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.