Maharashtra Weather Update : वर्षाअखेरीस झालेल्या अवकाळी पावसानंतर नव्या वर्षाचे स्वागत गुलाबी थंडीने होताना दिसले. राज्यातील काही भागात पहाटेच्या वेळी धुक्यांची चादर पसरलेली पाहायला मिळाली. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढणार आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभमुळे हवामान प्रणालीमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्येही किमान तापमानात वाढ झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातही थंडीचा प्रभाव तुलनेने कमी झाल्यामुळे महाराष्ट्रावरही याचे परिणाम दिसत आहेत.
देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर सातत्याने सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा, समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवन प्रक्रियेतून निर्माण होणारे ढग यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावरही ढगांचे सावट असल्यामुळे थंडीचा जोर कमी होताना दिसत आहे.
येत्या २४ तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून, किमान तापमान १५ अंशांच्या वर राहणार असून, कमाल तापमानाचा आकडा ३३ ते ३५ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात दाट धुकं आणि थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे राज्यात कोरड्या वाऱ्याचे प्रवाह वाढताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याबरोबर नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांच्या किमान तापमानात घट होणार आहे.
वर्षअखेरच्या दिवशी संपूर्ण दिवसभर मुंबईत हवामान दमट होते. परंतु असे असले तरी सुद्धा मुंबईतला गारवा मात्र दिवसभर कायम होता. आज(१ जानेवारी) रोजी दिवसभर उष्णता जाणवेल. रात्री मात्र वातावरण थंड राहील आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात थंडीही जाणवेल. ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा दिवसभर गरमीचे वातावरण पाहायला मिळेल. येत्या काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात सुद्धा सध्या दमट आणि ढगाळ वातावरण आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट वाढताना दिसत आहे. ३१ डिसेंबर रोजी २० अंश सेल्सिअस असणारे तापमान आज आणखी खाली घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* बदललेल्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे.
* पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.
* थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळ्या जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.हे ही वाचा सविस्तर: Maharashtra Weather Update : वर्षातील शेवटच्या दिवशी कसे असेल हवामान IMD रिपोर्ट वाचा सविस्तर