पुणे: राज्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत गारपीट देखील होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला.
राज्यातून थंडी बऱ्यापैकी गायब झाली असून, ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. ईशान्यकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणारे वारे यांचा मेळ मध्य भारतावर होत असल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (दि.२७) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यामध्ये आज धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला.
पुणे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात आणि अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
अधिक वाचा: कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई