Maharashtra Weather Update : आज (१० ऑक्टोबर) रोजी राज्यातील हवामान हे अंशत: ढगाळ राहणार आहे तर कुठे ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. राज्यात विदर्भ, कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आज (10 ऑक्टोबर) रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उद्या (११ ऑक्टोबर) रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे १२ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला अमरावती, बुलढाणा, जालना, बीड, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर घाट परिसरातही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतकरी बांधवांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, फवारणीची कामे पावसाची उघडीप बघून करावीत.
* काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
* तापमानात वाढ झाल्यामुळे, जनावरांच्या गोठ्याच्या छतावर साळीचे गवत किंवा स्प्रींकलरची व्यवस्था करावी, जेणेकरून गोठ्याच्या आतील तापमानात घट होईल.
जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे.
* नवरात्री व दसरा उत्सवामुळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. त्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.