गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणपट्टयात पावसाचा जोर वाढणार आहे.
त्यामुळे मंगळवारी रायगडला रेड तर मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचे हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना बुधवारी आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी आहे.
२४ तासांत १६९ मिमी, लोणावळ्यात मुसळधार- लोणावळ्यात रविवारी २४ तासात १६९ मिमी (६.६५ इंच) पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर कोसळल्या नंतर सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.- शनिवार व रविवार असे दोन दिवस लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला. त्या दोन दिवसात शहरात ३८५ मिमी (१५.१५ इंच) पाऊस झाला.- मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात रविवारी २४ तासांत ८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे,
भातसात ४९ तर बारवीत ४२ टक्के वाढगेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातसा धरणात ४९ टक्के तर बारवी धरणात ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.