Maharashtra Weather Update : संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे नुकतेच हवामान विभागाने सांगितले आहे. असे असताना महाराष्ट्रात आज (१९ ऑक्टोबर)पासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या दक्षिण आंध्रप्रदेश पासून कर्नाटक रायल सीमीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, अरबी समुद्रामध्ये चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसणार आहे. राज्यात आज (१९ ऑक्टोबर) रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात कडक उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. त्यामुळे अबाल वृध्द प्रचंड त्रासले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला दिसतोय.
मात्र, काल दुपारपासून काही भागात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता काहीश्या प्रमाणात कमी झालेली दिसत आहे. त्याच बरोबर हवेतील उष्णताही जाणवत आहे. याच दरम्यान संध्याकाळच्या वेळेला कडाक्याच्या विजांसह पाऊस पडत आहे. त्यामुळे गरमीपासून काहीश्या प्रमाणात सुटका झाली.
आज आणि उद्या मुंबईत पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात आणि पालघरमध्येही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि कोकण विभागात, तसेच गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गोव्यातही पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत. ऑक्टोबर महिन्यात मागील अठरा दिवसांमध्ये गोव्यात तब्बल ११० टक्के अतिरिक्त पाऊस झाला असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे.
मुंबईसह कोकणात 'यलो अलर्ट'
मुंबईत शनिवारी आणि रविवारी पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग येथेही आठवड्याच्या शेवटी जोरदार गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, घाट परिसर, पुणे, पुण्यातील घाट परिसर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर यासारख्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यात देखील तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव तर विदर्भातील अमरावती यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणा येथे देखील पावसाच्या सरी बरसणार आहेत.
मराठवाड्यात पाऊस
आज आणि उद्या धाराशिव, नांदेड, लातूर, बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर २१ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व धाराशिव जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात २२ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पशुधनास वाढते तापमान लक्षात घेऊन गोठयाचे वायू व्हिजन व्यवस्थित पार पडण्यासाठी खिडकी किंवा पंखा याची व्यवस्था करावी तसेच जनावरास पाण्याने स्वच्छ धूवून काढावे, ज्यामुळे जनावरांना उष्णतेचा त्रास होणार नाही.
* फुल पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. फुल पिकास आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असताना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.