Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीत यंदा राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. तर, काही भागांत उन्हाचा तडाका पाहायला मिळाला. नागरिक उकाड्याने हैराण झाले.
या परिस्थितीत अजूनही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे थंडीची चाहुल कधी लागणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. थंडी पडण्यासारखी अनुकूल परिस्थिती सध्या निर्माण झाली नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (५ नोव्हेंबर) रोजी कोकणात पावसाची दाट शक्यता आहे. अशातच आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
थंडीची चाहुल कधी लागणार?
राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल देखील लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान हे ३३ अंश सेल्सियस आहे तर किमान तापमान हे २२ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. मात्र येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण देखील वाढणार आहे.
मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ
मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी आणि कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल.
शेतकऱ्यांना सल्ला
रब्बी हंगामात भाजीपाला पिकाचे गादी वाफे व लागवड केलेला भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.