मुंबई : हिमाचल प्रदेशमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतात काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे हवामानात बदल होत आहेत. या बदलामुळे अरबी समुद्रावरील आर्द्रता उत्तरेकडे खेचली जात आहे.
त्यामुळे सोमवारी मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ नोंदविण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२७ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची शक्यता आहे. २६ आणि २७ डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
२६ रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि २७ रोजी अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितली.
तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता
▪️२४ डिसेंबर रोजी मुंबई, कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात थंडी कायम राहील. दि. २५-२६ डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित थंडी कमी होईल.
▪️दि. २६ ते २८ डिसेंबर दरम्यानच्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.
▪️दि. २७ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची शक्यता आहे.
▪️नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम व लगतच्या परिसरात गारपिटीची शक्यता आहे.
▪️दि. ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
कुठे किती तापमान?
मुंबई : २०.४
ठाणे : २१.८
पालघर : १७.७
अलिबाग : १७.८
डहाणू : १८.९
अहिल्यानगर : १४.४
छ. संभाजीनगर : १७.४
कोल्हापूर : १८.६
महाबळेश्वर : १३.६
नाशिक : १४
धाराशिव : १८
रत्नागिरी : २१.१
सातारा : १५
मुंबईत ढगाळ हवामानामुळे दिवसाचे तापमान कमी, तर रात्रीच्या तापमानात वाढ होईल. दिवसा २४, तर रात्री २० असे तापमान असण्याची शक्यता असून, ढगाळ हवामानामुळे थंडी कमी होईल. वर्षाअखेर म्हणजे ३० डिसेंबरदरम्यान थंडीत वाढ होईल. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक