Join us

Maharashtra Weather Update राज्यात पुढचे चार दिवस वादळी पावसाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:47 PM

राज्यामध्ये पुढील चार दिवसमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१७) दिला आहे. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पाऊस अशीच स्थिती राज्यामध्ये असणार आहे.

पुणे : राज्यामध्ये पुढील चार दिवसमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१७) दिला आहे. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पाऊस अशीच स्थिती राज्यामध्ये असणार आहे.

शनिवारी (दि.१८) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रामध्ये येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे.

तसेच, मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यामध्येही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. सध्या राज्यामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

त्यातच सकाळपासून मात्र उन्हाचा चटका जाणवत असून उकाडा कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारी (दि. १७) काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. परंतु, कमाल तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असा दोन्हीचा अनुभव नागरिकांना मिळत आहे. राज्यात कोकणात मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

शनिवारी (दि. १८) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या ठिकाणी वादळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला.

शुक्रवारी पुण्यात ३६.६ कमाल तापमानाची नोंद झाली. तर राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगावात ४२ अंश सेल्सिअस होते.

अधिक वाचा: कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ

टॅग्स :हवामानपाऊसतापमानमहाराष्ट्रविदर्भमराठवाडाकोकण