जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. पुरात वाहून जाणे, वीज पडणे व इतर दुर्घटनांमध्ये तब्बल ९४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तीन हजारांहून अधिक पशुंचाही दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला. पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.
जुलै महिन्यात अधिक पाऊस
देशात जून ते जुलै महिन्यात सरासरी पाऊस ४४५.८ नोंदवला जातो. प्रत्यक्षात यंदा ४५३ मिमी पाऊस झाला आहे. १.८ टक्के अधिक पाऊस झाला, तर जून महिन्यात सरासरी १६५ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात १४७ मिमी नोंदवला गेला. १० टक्के पाऊस कमी झाला, तर जुलै महिन्यात सरासरी पाऊस २८० मिमी होतो, प्रत्यक्षात ३०५ मिमी पाऊस झाला असून, ९ टक्के अधिक आहे.
मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा
महिनाभरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे अद्यापही सर्वदूर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यात १७, जालन्यात २५, बीडमध्ये २७ जनावरे दगावली. धाराशिवमध्ये २७४ घरांचे, तर पालघरमध्ये ३४१ घरांचे नुकसान झाले. दुर्घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ तर पालघरमध्ये ८ जणांचे मृत्यू झाले.
ऑगस्ट महिन्यात कसा असेल पाऊस?
राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दिला.
ऑगस्टमध्ये देशात सरासरी पाऊस पडेल, काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाचा अंदाज गुरुवारी जाहीर केला.
ते म्हणाले, यंदा देशामध्ये जून आणि जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा १.८ टक्के अधिक राहिले आहे. तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस झाला.
या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला.
देशाच्या बहुतांश भागात या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. मात्र, ईशान्य आणि शेजारच्या पूर्व भार, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.