पुणे: राज्यातील पावसाचा जोर बुधवारपासून (दि.२८) वाढण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थानवर, पं. बंगाल आणि झारखंडावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. परिणामी, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात १ सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागांत दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मात्र पावसाने हजेरी लावलेली आहे. राज्याच्या काही भागांत बधवारपासून पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
पावसाने विदर्भात मंगळवारी विश्रांती घेतली. केवळ अमरावतीला १ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी (दि.२९) आणि शुक्रवारी (दि.३०) विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात संततधार सुरुचपुणे शहरामध्ये मंगळवारी (दि.२७) दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावली. मध्येच ऊन पडायचे आणि परत पावसाच्या सरी कोसळायच्या, असा खेळ पुणेकरांनी अनुभवला. पुढील दोन-तीन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.