Maharashtra Weather Update: पश्चिम बंगाल व चेन्नई येथे कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडीसह काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. काही शहरांतील पाऱ्यात कमालीची घट झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे येत्या काही तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल व चेन्नईकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवसात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील किनारपट्टी जवळील गावांवर याचा थेट परिमाण होण्याची शक्यता आहे. विशेषता: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यानंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता देखील हवामान विभगाने वर्तविली आहे.
सध्या मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईत सकाळच्या सुमारास गारवा जाणवत असून येत्या २ दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीत आणखी वाढणार आहे. तर काही ठिकाणी सकाळी धुके आणि थंड हवा तर काही ठिकाणी दमट वातावरण अनुभवायला मिळते आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील पाच दिवस मराठवाड्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* रब्बी हंगामात भाजीपाला पिकाचे गादी वाफे व लागवड केलेला भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.