Maharashtra Weather Update : राज्यात येत्या तीन दिवस पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसात साजरी करण्याची वेळ येणार आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दरम्यान, राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (३० ऑक्टोबर) रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर ३१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर १ नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवामान कोरडे होत असल्याने सकाळी आणि रात्री थंडी पडू लागली होती. मात्र, दाना चक्रीवादळाचा तडाखा ओडिशाच्या किनारपट्टीला बसल्यामुळे हवेतील बाष्प पश्चिमेकडे वळले आहे. त्यामुळे राज्यात ऐन दिवाळीत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात मध्यरात्री पावसाची हजेरी
पुण्यात मध्य रात्री पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला, या पावसामुळे हवेतील गारठा वाढला. दरम्यान, पुण्यात येत्या दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील हवामान
आज (२९ ऑक्टोबर) रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४0 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक आदी पिकाची लागवड करून घ्यावी.
* आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी. झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.