Maharashtra weather update :
राज्यात येत्या काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज (२४ सप्टेंबर) पासून पुढील ४ दिवस वादळी वारा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
नैऋत्य मॉन्सूनने पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून माघार घेतली आहे. दरवर्षी मॉन्सून सामान्यत: १७ सप्टेंबर रोजी माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी २४ सप्टेंबर रोजी कोकण मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात परभणी बीड हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या (२५ सप्टेंबर) कोकणातील रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अत्यंत जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार दिवस व ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
पलघर, ठाणे, मुंबई, धुळे, नांदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत खूप जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी तूर, मका, सुर्यफुल, शेंगादाणे, सोयाबीन, भाज्या आदी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच आपल्या शेतात पावसाचे जास्त जाऊ नये, याची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.