शुक्रवार (३० ऑगस्ट) रोजी पर्यंत उघडीप देणाऱ्या पावसाने आता पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. हा पाऊस पुढील काही दिवस तरी राज्यातील बहुतांश भागांत बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे परिणाम दिसून येत आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील कोकण किनारपट्टीसह विदर्भाला पावसाचा तडाखा बसणार आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
बदलत्या वातावरणामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी मुग आणि उडीद पिकांची काढणी लवकर करावी, असा सल्ला दिला आहे.
चक्रीवादळाचा धोका टळला, पण काळजी घ्या
सध्याच्या परिस्थितीत गुजरातमध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि सोबत तीव्र होणारे चक्राकार वारे अरबी समुद्राच्या दिशेने सरकले असून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ही प्रणाली अधिक सक्रीय होताना दिसत आहे.
दरम्यान सध्या अरबी समुद्रात असणाऱ्या या वादळाची दिशा दक्षिण पश्चिमेला असल्यामुळे राज्यात मुसळधार नव्हे तर मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.