मुंबई : राज्यभरात मान्सूनने आता पूर्णपणे उघडीप घेतली असली तरी अवकाळी पावसाचा फेरा कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात शनिवारसह रविवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनने आता काढता पाय घेतल्यानंतर उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य मान्सूनचे आगमन दक्षिणेकडील राज्यात होते.
दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हा पाऊस पडतो. या राज्यांपुरता हा मान्सून निगडित असला तरी त्याचा किंचित परिणाम म्हणून महाराष्ट्रातहीपाऊस पडतो.
ईशान्य मान्सून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबदरम्यान पडतो, असे हवामान अभ्यासक अर्थया शेट्टी यांनी सांगितले.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात यापुढे तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पाऊस म्हणूनच संबोधले जाते.
कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून गुरुवारी झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल. तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे.
१७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे