Join us

Maharashtra Weather Update राज्यात कुठे राहणार उष्णतेची लाट अन् कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 9:31 AM

मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्याला चांगलेच झोडपले आहे. बुधवारपासून (दि.२२) पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुणे : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्याला चांगलेच झोडपले आहे. बुधवारपासून (दि.२२) पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

मॉन्सून सध्या अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. तिथून मान्सून पं. बंगालच्या उपसागरातील काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग पुढील दोन दिवसांमध्ये व्यापेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

हरियाणापासून ते मराठवाड्यापर्यंत हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मराठवाडा, प. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, हिंगोली, परभणी, जालना, बीड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

उष्णतेची लाट कुठे?राज्यातील धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, अकोला, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दिवसा व रात्री देखील हवामान दमट व उष्ण राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस कमी होऊन, गुरुवारपासून (दि.२३) तापमानात वाढ होईल असेही डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

अधिक वाचा: Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास

टॅग्स :हवामानतापमानपाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजविदर्भमराठवाडा