Maharashtra weather Update :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार होत आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पाऊस पुन्हा राज्यात पुनरागमन करणार आहे. पुढील काही दिवस, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात काही प्रमाणात बदल होताना दिसत आहे.
राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाने हाजेरी लावली.
मात्र आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागने दिला आहे. येत्या दोन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार आज(२० सप्टेंबर) पासून पुढील तीन दिवस विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शनिवारी (दि २१) मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे तर २२ सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व २३ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी मुग, उडीद पिकांची काढणी लवकरात लवकर करावी तसेच शेतमाल कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवावे.
शेतकऱ्यांनी पशुधानाची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच पावसाच्या दरम्यान आपले पशुधन आडोश्याला आणि सुरक्षित जागी बांधण्याचा सल्ला कृषि विभागाने दिला आहे.
मुंबईत हलक्या पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरात येत्या काही तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात असे असेल हवामान
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपार व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर उद्या २० सप्टेंबर रोजी आकाश ढगाळ राहून दुपारनंतर संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.