Maharashtra weather Update : महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड भागात कमी पाऊस होतो. म्हणजेच तयार झालेले कमी दाब क्षेत्राची सर्व ऊर्जा पुर्वोत्तर ७ राज्यात व हिमालयाच्या पायथ्याशी खेचली जात आहे.
सहसा जेंव्हा आसामकडील म्हणजे पुर्वोत्तर ७ राज्यात व हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे सिक्कीम हिमालयीन पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा हिमालयीन भाग येथे जेंव्हा अति जोरदार पाऊस होतो.
म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळली आहे. परंतु ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान आवर्तनाच्या पावसाची शक्यता आता जाणवत आहे.
एम.जे.ओची स्थिती
३ ऑक्टोबरपासून एम.जे.ओ, भारत विषुववृत्तात महासागरीय परिक्षेत्रात संचारित झाला आहे. परंतु त्याचा ‘एम्प्लिटुड’(वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) एकापेक्षा कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सध्या व दुसऱ्या पंधरवड्यात देशात तसेच महाराष्ट्रात जो काही पाऊस पडणार आहे, त्यास ह्या एमजेओ मुळे मदतच होणार आहे.
ला- निना
गेल्या वर्षी २०२३ च्या पावसाळी हंगामापासून पावसास अटकाव करणारा एल- निनो कार्यरत होता. तो ह्या वर्षी २०२४ चा पावसाळी हंगामात तो तटस्थच राहिला व हंगाम संपला तरी एन्सो अजुनही तटस्थच आहे.
आता ऑक्टोबर महिन्यात 'ला- निना' अवतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे घडले तर ऑक्टोबर ते डिसेंबर या ईशान्य मान्सून च्या काळात दक्षिणेकडील तामिळनाडू केरळ राज्यात पावसाचे प्रमाण कदाचित कमी राहून महाराष्ट्रासह मध्य भारतात चांगला पाऊस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयओडी
सुरुवातीला आयओडी धन होता परंतु संपुर्ण पावसाळी हंगामात तटस्थच राहिला. त्यामुळे पावसाला अटकाव झाला नाही. तो अजुन तसाच आहे. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या ईशान्य मान्सून च्या काळात दक्षिणेकडील चार राज्यात चांगला पाऊस होण्यासाठी ऋण होणे गरजेचे आहे.
म्हणजेच बंगाल उपसागाराचे तापमान हे अरबी समुद्रापेक्षा अधिक असेल. सध्या तो तटस्थ असल्यामुळे दक्षिणेकडील ४ राज्यात येत्या ३ महिन्यात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये पडणाऱ्या पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.
ऑक्टोबर महिन्याचा पावसाचा मासिक अंदाज
संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो सरासरीच्या ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो सरासरीच्या ११२ टक्के पेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. त्यातही कोकण व घाटमाथ्यावर ही शक्यता अधिक आहे. -
कमाल तापमान
ऑक्टोबर महिन्यात दुपारी ३ चे कमाल तापमान कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भात सरासरी पेक्षा कमी तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणून मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमानात अधिक तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे.
किमान तापमान
संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ऊबदार रात्री जाणवतील तर भल्या पहाटे दव (बादड) पडण्याचे प्रमाण कमी जाणवेल.
(संकलन: माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)