Maharashtra Weather Update :
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून धुमाकुळ घालत असलेल्या पावासाचा जोर आजपासून कमी होणार आहे. आज (२८ सप्टेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तर विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, धारशिव या जिल्ह्यामध्ये मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासहित तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बरसणार
पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यातील हवामान
पुणे व परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २९ सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील हवामानमराठवाड्यात आज (२८ सप्टेंबर) रोजी अंशत: ढगाळ २९ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
मराठवाडयात आज( २८ सप्टेंबर) रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर २९ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असल्यास काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत. पशुंना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी बांधावे. असा सल्ला देण्यात आला आहे.