Join us

Maharashtra Weather Update : गणराजाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची उपस्थित राहणार का? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 9:34 AM

राज्यात आज गणरायला निरोप दिला जाणार आहे. राज्याच्या काही भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update :

राज्यात आज(१७ सप्टेंबर) रोजी गणरायला निरोप दिला जाणार आहे. या दिवशी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. IMD ने  दिलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अति तीव्र कमी दाबाचा पट्टा आज पश्चिम बंगालचा उपसागर व लगतच्या झारखंडच्या भागात निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण, गोव्यासह पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी, विदर्भामध्ये काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोव्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे आणि बाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामन्यत: कोरडे राहणार आहे. तर अधून मधून आकाश ढगाळ राहणार आहे. पुण्याजवळील घाट माथ्यावर काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व मोसमी पाऊस या वर्षी त्याच्या ठरलेल्या वेळी माघार घेणार असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे. राज्यात सध्या पाऊस गायबच झाला आहे. आता पाऊस दीर्घ विश्रांती घेण्याच्या तयारीत असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे.अधून मधून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला?

राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी. उडीद, मुगासह या काळात काढणीला आलेली पिके शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत. असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानकोकणपुणेमुंबईमहाराष्ट्रपाऊस