Join us

Maharashtra Weather Update : आज राज्यात या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 10:38 AM

पुणे, रायगड, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना शुक्रवारी यलो अलर्ट दिला आहे.

पुणे : सध्या राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळत असून, पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. परंतु, जोरदार पाऊस नाही.

शुक्रवारपासून (दि.९) पावसाची राज्यातही उघडीप असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे, रायगड, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना शुक्रवारी यलो अलर्ट दिला आहे.

राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर पाऊस झाला. तो देखील आता ओसरला आहे. एका दिवसात ५०० मिमी पावसाची नोंद घाटमाथ्यावर झाली. पण आता मात्र २०-३० मिमी पावसाची नोंद होत आहे.

शुक्रवारी (दि.९) रायगड, पुणे, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल, तर नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या इतर भागामध्ये मात्र पावसाची उघडीप असणार आहे. दरम्यान, शनिवारपासून (दि.१०) विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार आणि सोमवारी काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या तीन दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीपचा अंदाज आहे.

टॅग्स :हवामानपाऊसपुणेविदर्भकोकणमराठवाडा