Join us

Maharashtra Weather Updates: आज 'या' जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता ; वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 09:14 IST

राज्यातील तापमान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चढ - उतार पाहायला मिळत असून आज सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates)

Maharashtra Weather Updates : राज्यातील तापमानात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चढ - उतार पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात थंडी जाणवू लागली आहे. तर, अनेक भागांत ऊन-पाऊसाचा खेळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आज (१५ नोव्हेंबर) रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१५ नोव्हेंबर) रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि घाट परिसर, सातारा जिल्हा आणि घाट परिसर आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, उद्या (१६ नोव्हेंबर) रोजी पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात १७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असे हवामान विभागाने कळविले आहे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान संमिश्र स्वरुपात राहण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यातील अनेक भागांत सकाळी ऊन आणि रात्री थंडी राहील. कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा १२ अंशांनी घसरला आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबईत कसे हवामान

नोव्हेंबर महिना अर्ध्यावर आला तरी मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान २० अंशांपर्यंत खाली गेले होते. परंतु, आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आता २१ नोव्हेंबर नंतर तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, तोपर्यंत मुंबईसह उपनगरातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील हवामान

मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर १५ नोव्हेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही मात्र त्यानंतर हळूहळू १ ते २ अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअस ने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्याकारणाने पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर पूर्ण करावी.

* संत्रा/ मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणकोल्हापूरमराठवाडा