Maharashtra Weather Updates: बंगालच्या उपसागरात डिप्रेशन निर्माण झाल्यामुळे राज्यातील काही भागात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला.
मान्सून परतल्यानंतरही राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे आज (१७ ऑक्टोबर) रोजी काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तर, उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरींसह उन्हाचा चटकाही जाणवणार आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज (१७ ऑक्टोबर) रोजी सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथे जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी बसरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
या जिल्ह्यांत यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप लक्षात घेऊन सोयाबीन, मका, भुईमुग आदी पिकांची काढणी करून सुरक्षित जागी साठवणूक करावी.* जनावरांना पावसाची अंदाज लक्षात घेऊन सुरक्षित जागी बांधावे. तसेच गोठ्या मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी.