Maharashtra Weather Updates :
महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याच अंदाजानुसार हवामान विभागाने आज (२५ सप्टेंबर) रोजी रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर, मुंबईसह, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर आणि वाशीमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यांसह मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज आहे.
सोमवारी(२३ सप्टेंबर) सकाळीपासून पावसाचे पुनरागमन होण्यापूर्वी मुंबई शहरात दीर्घकाळ कोरडेपणा जाणवला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. असाच पाऊस मंगळवारीही दिसून आला. हवामान विभागाने गुरूवारी (२६ सप्टेंबर) रोजी पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे,
राज्यात विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा अंदाज आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी ५.३० वाजेनंतर मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस संध्याकाळी सुरू झाला आणि रात्रभर कायम राहिला. तसेच आजही पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. राज्यात सर्वत्र मॉन्सून परत एकदा दमदार हजेरी लावली आहे. राज्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्र किनारपट्टीसह कर्नाटक आणि गोव्यात अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त, ईशान्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून आधीच माघार घेतली आहे. आज तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर कर्नाटक आणि रायलसीमामध्येही पाऊस पडेल. माहे, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि रायलसीमा येथे असेच हवामानाचे नमुने दिसून येतील.
आज (२५ सप्टेंबर) रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मुसळधार तर नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट रायगड, पुणे या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घाट परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
'या' जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, अहमदनगर, वाशिम या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट धुळे, नांदूरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानुसार पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी तसेच शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांना उघड्यावर सोडू नये अथवा बांधू नये. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.