Join us

Maharashtra Weather Updates : दोन दिवसांत राज्यातील पावसाचा जोर होणार कमी! काय आहे ५ दिवसांचा अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 10:05 PM

Maharashtra Latest Weather Updates : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस पडलेला आहे. मागच्या दोन आठवड्यापूर्वी केवळ हिंगोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. 

Maharashtra Latest Weather Updates : राज्यात मागील एका महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला असून राज्यातील बहुतांश भागाच चांगला पाऊस पडताना दिसत आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस पडलेला आहे. मागच्या दोन आठवड्यापूर्वी केवळ हिंगोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. 

दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या अंदाजाचा विचार केला तर राज्यात ५ ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. उद्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून पश्चिम घाटमाथ्यावर आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

पण ५ ऑगस्टपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कमी होणार असून राज्यात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पण या तीन दिवसांमध्ये एकाही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला नाही. ५ ऑगस्ट रोजी केवळ सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या तीनही दिवसांमध्ये कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही. 

मागच्या एका महिन्यातील पर्जन्यमानाचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे हे कमी पावसाचे होते. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत येणाऱ्या तीन दिवसांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  ६ व ७ ऑगस्ट रोजी कोकणातही पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरी