Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ- उतार पाहायला मिळत आहे. बहुतेक जिल्ह्यांत ऑक्टोबर हीटचा चटका जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामाने विभागाने आज (३१ ऑक्टोबर) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (३१ ऑक्टोबर) रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उर्वरित महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहील तसेच तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक भागात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत आहे. राज्यातील सोलापूर येथे बुधवारी (३० ऑक्टोबर) रोजी सकाळपर्यंत सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, अकोला आणि वर्धा येथील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर होते. याशिवाय, अमरावती, डहाणू, नागपूर, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर येथे सर्वात कमी १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यातील हवामान
आज (३१ ऑक्टोबर) रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतकरी बांधवांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, मळणी केलेल्या सोयाबीनची उन्हात वाळवूनच साठवणूक करावी.
* दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.