Maharashtra Weather Updates : मागच्या आठवड्यापासून राज्यातील पाऊस सरासरीपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. तर संपूर्ण राज्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तर येणाऱ्या आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमीच असेल अशी माहिती हवामानशास्त्र विभागातील हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांनी दिली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यातील पावसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तर एकूणच मान्सूनच्या हंगामाचा विचार केला तर केवळ हिंगोली जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मागचा एक आठवडा आणि पुढील एक आठवड्यापेक्षा जास्त काळ राज्यात पावसाचा जोर कमी असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील सर्वच भागांत चांगला पाऊस झाला होता. तर खरिपातील पिके वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसामध्ये काही दिवसांचा खंड अपेक्षित होता. अपेक्षेप्रमाणे पावसामध्ये खंड पडला असून हा पावसाचा ओसरलेला जोर असाच किमान दहा दिवसापर्यंत राहील अशीही माहिती खोले यांनी दिली आहे.
पावसाचा जोर का ओसरला?पश्चिम किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचा पट्टा दिसून येत नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीच हालचाल दिसून येत नाही. तर पश्चिम किंवा नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेगही कमी झाला आहे. वाऱ्याची दिशा बदलली असून वायव्येकडून राज्यात मोसमी वारे येत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील.