राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडखा जाणवू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकणातील अलिबाग येथे राज्यातील इतर भागात उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ हवामान आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमुळे विदर्भाच्या कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळाली.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलका पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेईल, असेही हवामान विभगाने सांगितले आहे. 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाकडून पुणे आणि साताऱ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येथे कमी दाबाचा पट्टा
पश्चिम-मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर डीप डिप्रेशनमध्ये होणार असून ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.