Maharashtra Weather Warning : राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह २७ आणि २८ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात होईल. यात नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल.
शुक्रवार (२७ डिसेंबर) रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे.
या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात घट होईल. मात्र, मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.
३० डिसेंबरपासून थंडीत वाढ
२९ डिसेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान पाहायला मिळेल आणि ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन रब्बी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
* पशुंना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
* वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर