Maharashtra Weather update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे चक्रीवादळ २७ नोव्हेंबरपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम राज्यावर होणार असून थंडी वाढणार आहे.
२८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी आणि रायलसीमाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. विशेषत: नैर्ऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर बुधवारपर्यंत चक्रीवादळात होऊन येत्या दोन दिवसांत श्रीलंकेचा किनारा ओलांडून तामिळनाडूच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२६ नोव्हेंबर) रोजी जारी केलेल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, डीप डिप्रेशन त्रिंकोमालीपासून ३१० किमी आग्नेयेला, पुद्दुचेरीपासून ७१० किमी दक्षिण-आग्नेय आणि चेन्नईपासून ८०० किमी दक्षिण-आग्नेय दिशेला केंद्रित आहे.
हे चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेकडे सरकत राहील आणि आज(२७ नोव्हेंबर) रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत हे चक्रीवादळ श्रीलंकेचा किनारा ओलांडून उत्तर-वायव्येकडे तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे.
उत्तर भारतात हवामान थंड झाले आहे. यामुळे राज्यातही थंड वारे वाहत असून तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करू शकतो, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
हे चक्रीवादळ आज (२७ नोव्हेंबर)पर्यंत आणखी तीव्र होऊन तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात ३० नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पारा घसरला आहे. पुण्यातील तापमानात एक ते दीड अंशांनी कमी झाले आहे.
रात्रीपासून थंड वारे वाहू लागले आहेत. या सोबतच आता दिवसादेखील थंडी जाणवू लागली आहे. पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहेत. पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढणार आहे.
हवामान विभागाने डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा जास्त वाढला आहे. तापमान हे ८ ते १० डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. तर काही जिल्ह्यात तापमान ११ डिग्रीसेल्सिअस पर्यंत खाली आले आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
* राज्यात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
* डिसेंबर महिन्यात थंडी वाढणार असून या पासून बचाव करण्यासाठी स्वेटर, गरम कपड्यांचा वापर करून शरीर गरम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
* काही राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी राज्यात मात्र, पुढचे ७ दिवस पाऊस पडणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
अहिल्यानगरमध्ये पारा ९.२ अंशांवर
मंगळवारी (२६ नोव्हेंबर) रोजी अहिल्यानगरमध्ये राज्यात सर्वांत कमी ९.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर पुण्यात १०.८, जळगावात ११.०, सातारा १२.९, छत्रपती संभाजीनगर १२.१, परभणी १२.०, नागपुर १२.० आणि गोंदियात १२.२, सातांक्रुजमध्ये १६.८ आणि अलिबागमध्ये १६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
दक्षिण भारतात पाऊस
तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज (२७ नोव्हेंबर) अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या भागात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. विशेषत: शहरी भागात स्थानिक पूर आणि पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.