मागच्या दोन आठवड्यापासून राज्यभरातील थंडीचा कडाका वाढला असून फेब्रुवारी महिन्यामध्ये थंडी आणि पाऊस असणार असल्याचं मत जेष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे.
थंडी व दिवसाचा ऊबदारपणा
ह्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यतेमुळे चालु फेब्रुवारी महिन्यात थंडीचे प्रमाणही दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमी जाणवेल. कोकण व उत्तर महाराष्ट्र वगळता दुपारचे कमाल तापमान ह्या महिन्यात सरासरी इतके तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक राहील. म्हणजे दिवसाचा ऊबदारपणा नेहमीसारखाच जाणवेल.
थंडीच्या लाटेची शक्यता फेब्रुवारी महिन्यात नाही
चालु आठवड्यात महाराष्ट्रात सुरवातीला काहींशी थंडी जाणवेल. मात्र त्यानंतर थंडी कमी जाणवेल.
पाऊस
फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीचा कालावधी हा थंडीचा व साधारण शेवटचा आठवडा हा थंडी कमी होण्याचा कालावधी असतो. आणि पावसाची मासिक सरासरी ह्या महिन्यात अगदी नगण्यचं असते. तरी देखील ह्या महिन्यात पावसासंबंधी भाष्य करतांना, ह्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे ७ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दर्शवते. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ ह्या ५ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात तर ही शक्यता अधिक जाणवते. कोकणातील वर स्पष्टीत ७ जिल्ह्यात मात्र ही शक्यता सरासरीपेक्षा खुपच कमी जाणवते.
- माणिकराव खुळे (Meteorologist (Retd.) IMD Pune.