पुणे : राज्यामध्ये शुक्रवारी अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. सायंकाळी कोल्हापूर, सातारा, सांगली येथे हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
पुणे, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी विजांसह ढगांच्या गडगडाटात पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सध्या राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
विदर्भवगळता राज्यात शनिवारी ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात हा परिणाम जाणवेल.
राज्यात कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २१ दरम्यान असून, ही दोन्ही तापमाने जवळपास सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक आहेत. यात आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
थंडी कधीपासून?
◾ दोन दिवस राज्यातील कमाल तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान २ दिवसांनंतर २ ते ३ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे.
◾ विदर्भ वगळता राज्यात शुक्रवार व शनिवारी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
◾ दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाच्या परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात १६ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे.
◾ १७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीची स्थिती पूर्ववत होईल. मुंबईसह कोकणातही त्यामुळे ढगाळ वातावरण निवळेल.