Join us

Maharsahtra Weather Update : काही ठिकाणी ऑक्टोबर हिटच्या झळा तर काही ठिकाणी अवकाळी बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 10:47 AM

मुंबई शहर आणि उपनगरांतील कमाल तापमान अद्याप ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, पुढील चार दिवस म्हणजे रविवारपर्यंत कमाल तापमानाचा पारा तेवढाच राहणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतील कमाल तापमान अद्याप ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, पुढील चार दिवस म्हणजे रविवारपर्यंत कमाल तापमानाचा पारा तेवढाच राहणार आहे. त्यातही रात्रीचे तापमान मात्र २५ अंश नोंदविण्यात येईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

शेवटच्या आठवड्यातही मुंबईकरांना ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी सायंकाळनंतर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून, बदलत्या वातावरणानुसार आणि उष्णतेमुळे यंदाची दिवाळी मुंबईकरांसाठी 'हॉट' ठरणार आहे.

यंदा मुंबईकरांसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा तापदायक होता. दुसऱ्या आठवड्यानंतरही कमाल तापमान ३५ अंशांच्या घरातच राहिले. दुसऱ्या बाजूला किमान तापमानात घट होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यात फारसा बदल झाला नाही.

यात भर म्हणून की काय महिन्याची सुरुवात प्रदूषणाने झाली. त्याचवेळी ऑक्टोबरअखेर थंडीची चाहुल लागेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली होती. त्यानुसार आठवड्यातील पहिले दोन दिवस किमान तापमान खाली घसरलेही होते.

मात्र, पुन्हा किमान तापमानाने उसळी घेतली. आता कमाल आणि किमान तापमान दोन्ही स्थिर असून, तीन ते चार दिवस यात फार फरक पडणार नाही, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांची दिवाळी उष्णच राहणार आहे. फटाक्यांमुळे वातावरणातील प्रदूषण आणि तापमानही वाढेल्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे.

उत्तर भारतानंतरच मुंबईत गारवा■ उत्तर भारतात जोवर कडाक्याची थंडी पडत नाही आणि तेथून वाहणारे शीत वारे खाली दक्षिण भारताकडे सरकत नाहीत, तोवर मुंबईकरांना म्हणावी तशी थंडी जाणवणार नाही.■ यासाठी मुंबईकरांना १५ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे, असे हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :तापमानहवामानमुंबईपाऊस