पुणे : हवामान बदल ही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा आहे. या बदलामुळे शेती, उद्योग, वाहतूक, आरोग्य या क्षेत्रांवर दूरगामी परिणाम होणार आहेत. तर यासाठी शेतकऱ्यांना काय उपाय करायला हवेत आणि माध्यमांनी याची जागृती कशा प्रकारे करायला पाहिजे यासंदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक परिषद आयोजित केली होती. यामध्ये हवामान बदलांवर बोलण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनीही हजेरी लावली होती.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प या तीन संस्थाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक आणि विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकीचे मुख्य डॉ.एस.डी. गोरंटीवार, डॉ. अनुराधा अग्रवाल, डॉ. बी. व्यंकटेस्वरलू, डॉ. एम.सी. वर्शनेया, डॉ. आर. सी. अग्रवाल, डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, डॉ. व्ही. एम. राव, डॉ. के. सम्मी रेड्डी, डॉ. एन. जी. पाटील, विजय कोळेकर, डॉ. एस. डी. मासाळकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, मागच्या एका शतकामध्ये औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीच्या तापमानामध्ये १ ते १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तर येणाऱ्या काळात ग्लोबल वार्मिंग ही एक धोक्याची घंटा असणार आहे. यामुळे वातावरणात झालेल्या बदलांनुरूप शेतकऱ्यांनीही बदलणे गरजेचे असून विद्यापीठे, हवामान विभाग, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे या विभागाकडून हवामानाची माहिती दिली जाते पण ती योग्य पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ही माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
हवामान बदलज्यावेळी देशात किंवा जगभरात औद्योगिकीरणाला सुरूवात झाली नव्हती तेव्हापासून आत्ताचा विचार केला तर पृथ्वीच्या तापमानामध्ये १ ते १.५ डिग्री तापमान वाढ झाली आहे. त्याचबरोबर पाणीपातळीत वाढ, पुरांच्या प्रमाणात वाढ, ग्रीन हाऊस गॅसमध्ये कमालीची वाढ, पावसांचे दिवस कमी होणे, पिकांची प्रतिकारक्षमता कमी होणे असे बदल झाले आहेत. यामुळे वाहतूक, आरोग्य, शेती, पाणी, वातावरणांवर विपरीत परिणाम होणार आहेत. हे बदल येणाऱ्या काळासाठी आव्हानात्मक असून या बदलांबरोबर शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे.
हवामान बदलामुळे विकसीत झालेले तंत्रज्ञान/पद्धतीशेततळे, विहीर पुनर्भरण, सीक्ष्म सिंचन, बीबीएफ, शून्य मशागत, लिंबोळी अर्क, बीजोत्पादन, फळबाग, शेडनेट, रेशीम उद्योग अशा तंत्रज्ञानाचा विकास हा हवामान बदलामुळे झाला आहे असं प्रतिपादन विजय कोळेकर यांनी केलं आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात हवामान बदल रोखण्याऐवजी या बदलांसोबत शेतकऱ्यांनी कसं बदललं पाहिजे, कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत असंही ते म्हणाले.
माध्यमांची भूमिकादेशातील साधारण ९२ कोटी नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त लक्ष दिले जात नाही किंवा त्यांना प्राधान्य दिले जात नाही. सरकार आणि प्रशासनातही शेतीला धरून अनेक त्रुटी आहेत पण माध्यमांकडून यावर आवाज उठवला जात नाही. तर येणाऱ्या काळात शेतीमध्ये अमूलाग्र बदल करावे लागणार असून त्यासाठी माध्यमांनी हवामान बदलांबरोबर डिजीटल अॅग्रिकल्चरला प्रमोट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असं मत विद्यापीठ, राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प या तीनही संस्थांच्या वरिष्ठांनी व्यक्त केले.