लातूर : मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे असले तरी फक्त डाव्या कालव्या अंतर्गत लाभधारक शेतकऱ्यांनी मागणी आहे. त्यानुसार डाव्या कालव्यातून रब्बीस पिकासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.
डाव्या कालव्या अंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी मांजरा प्रकल्प शाखा अधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने १७ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्यात आले होते. या कालव्या अंतर्गत दहा हजार हेक्टर लाभ क्षेत्र असले तरी फक्त ५०० हेक्टर साठीच मागणी होती.
उजव्या कालव्याअंतर्गत अद्याप मागणी आलेली नाही. मागणी आल्यानंतर या कालव्यातूनही पाणी रब्बी पिकासाठी सोडले जाईल असे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. डाव्या कालव्या अंतर्गत केजसअंबाजोगाई, लातूर आणि रेणापूर तालुक्यातील लाभ क्षेत्र आहे. या तीन तालुक्यातील मिळून दहा हजार सेक्टर क्षेत्र भिजू शकते.
असा आहे पाणीसाठा
१९२ दलघमी एकूण पाणीसाठा मांजरा प्रकल्पात आहे. त्यापैकी १४४.९९८ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. गतवर्षी प्रकल्पात फक्त १५ टक्केच जिवंत पाणीसाठा होता. यावर्षी ८१.९४ टक्के पाणीसाठा आहे.
पहिल्या आवर्तनात ३.३७ दलघमी पाणी...
• मांजरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातून पाचशे हेक्टर क्षेत्रासाठी मागणी आल्याने पहिले आवर्तन पूर्ण झाले. १७ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्यात आले.
• जवळपास ३.३७ दलघमी या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. पंधरा दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा दुसऱ्यांदा आवर्तन होईल. तेही वीस ते पंचवीस दिवसांचे असेल.
मागणीनुसार पाणी सोडले
यंदा पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे रबी हंगामात शेतीला पाणी सोडण्याची मागणी नाही. डाव्या कालव्याअंतर्गत साडेचारशे ते पाचशे हेक्टर्स क्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांनी केली. त्यानुसार पाणी सोडले. - पाटबंधारे विभाग, लातूर.
गतवर्षीपेक्षा धरणात पाचपट पाणीसाठा...
• मांजरा प्रकल्पामध्ये गतवर्षी आजच्या तारखेत १५.५१% जिवंत पाणीसाठा होता. म्हणजे, ३७.४५३ दलघमी एवढेच पाणी होते. त्यामुळे गतवर्षी शेतीला पाणी सोडलेले नाही.
• यंदा पाणी मुबलक असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून अर्थात कालवा समितीच्या सल्लागार समितीने पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. परंतु मागणी नाही. डाव्या कालव्या अंतर्गत मागणी आली. त्यानुसार पाणी सोडले.
• सध्या प्रकल्पात ८१.९४% इतका पाणीसाठा आहे. म्हणजे, १४४.९९८ दलघमी इतका जिवंत पाणीसाठा आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत पाचपट अधिक आहे. गतवर्षी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे शेतीला सोडण्यात आलेले नव्हते.
• यंदा मात्र प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
• रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी कसे पाणी सोडले जाणार, याबाबतचे नियोजन कालवा समितीच्या सल्लागार समितीने केले आहे.
हेही वाचा : Success Story : मेहनतीला मिळाली बाजारभावाची साथ; विनायक यांची आंतरपिकांत जोरदार कमाल