लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, धारूर, कळंब या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ७७.३२ टक्के भरले आहे. पाणीपातळी ६४१.३९ मीटर झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा १८३.९६४ दलघमी झाला आहे. यातील जिवंत पाणीसाठा १३६.८३४ दलघमी आहे.
या जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ७७.३२ टक्के आहे. सध्या धरणात ०.७४२ दलघमी पाण्याची आवक असून, आवक दर १७.१८ क्यूमेक आहे.
बारा तासांमध्ये धरणात ६०७ क्युसेक पाणी आले असल्याची माहिती शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली. गेल्या १५ दिवसांमध्ये धरणामध्ये झपाट्याने पाणी वाढून धरण भरण्याच्या मार्गावर आहे. फक्त २३ टक्के धरण भरायचे राहिले आहे. ७७ टक्के धरण भरले असून, यंदा मुबलक पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी शेतीला पाणी मिळेल, याची शंभर टक्के खात्री आहे. रबी पिकासाठीही पाणी मिळू शकते.
त्यासाठी कालवा समितीची बैठक व्हावी लागेल. त्यामुळे धरणाच्या सिंचनाखाली असलेल्या शेतकऱ्यांचे कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.