मांजरा नदीचा उगम असलेल्या पाटोदा महसूल मंडळामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून, यामुळे धनेगावच्या मांजरा प्रकल्पात ९८.८२४ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. मांजरा धरण ३० टक्के भरले असून रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या सहा तासात तीन टक्के पाणीसाठा वाढला आहे.
प्रकल्प २७% वरून ३०% पर्यंत भरला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून यंदा शेतीला पाणी मिळेल, अशा अपेक्षा वाढल्या आहेत.
शनिवारी उगलेवाडी अर्थात पाटोदा महसूल मंडळामध्ये ७८ मिमी पाऊस झाला होता. शुक्रवारी प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मांजरा प्रकल्पात येवा वाढला आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणात २७ टक्के पाणीसाठा होता. त्यात दुपारी बारा वाजेपर्यंत झपाट्याने वाढ होऊन ३०% पर्यंत पाणीसाठा गेला आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये पाटोदा मुसलि मंडळात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. त्याचा फायदा मांजरा प्रकल्पाला झाला असून पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
शेतीला पाणी मिळणार; आशा पल्लवित
• मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठा पाऊस होत असल्याने यंदा धरण भरून शेतीला पाणी मिळेल, अशी आशा पल्लवीत झाल्या आहेत.
• गेल्या पंधरा दिवसातच धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आलेले आहे. शिवाय, रविवारी दिवसभरात धरणात तीन टक्केच्या वर पाणी नव्याने आल्याने शेतीला पाणी मिळेल. गतवर्षी पाणीसाठा झाला नव्हता.