सोमवारी दुपारी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व केज तालुक्यात पाऊस झाल्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजता ३ व ४ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले. शनिवारी १ व ६ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. सध्या मांजराच्या चार दरवाज्यातून मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ७२ गावाला पाण्यासाठी व शेती सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असणारे मांजरा धरण २५ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक सुरू राहिल्यामुळे मांजरा धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सहाव्यांदा मांजरा धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडण्यात आले होते.
त्यामुळे १ हजार ७४७ क्युसेक्स (४९.४८ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. दरम्यान सोमवारी दुपारी मांजराच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे पुन्हा मांजरा धरणाचे वक्रद्वार क्रमांक ३ व ४ हे सोमवारी दुपारी ४ वाजता उघडण्यात आले आहेत. सध्या सहाही दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत.
यापुढे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरील बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मांजरा धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी केले आहे.
सोमवारी वाढली आवक
■ चालू पावसाळ्यात यापूर्वी सहा वेळा मांजराचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात करण्यात आला आहे.
■ आजपर्यंत सहा वेळा ६८.८१ दलघमी पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात करण्यात आला आहे.
■ सोमवारी दुपारी मांजरा धरणात पाण्याची आवक ९८.९६ क्युमेक्सने वाढल्यानंतर सध्या सातव्या वेळी एकूण चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.
■ ९८.९६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत सोडण्यात येत आहे.