गेल्या दोन महिन्यांपासून कृष्णमेघांनी आभाळ भरून येत होते. कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या बातम्या पाहून, वाचून मराठवाडावासीय आशाळभूतपणे मुसळधार पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते.
पण, झाली तर थोडी रिपरिप होई, गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या मराठवाड्यावर अखेर गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाने मेहरबानी केली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतीच्या सिंचनाची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे
सर्वदूर मुसळधार पावसामुळे मराठवाडा सुखावला. केवळ लातूर जिल्ह्यात हलका पाऊस पडला, तर तिकडे नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत भरपूर पावसामुळे जायकवाडी धरणात आवक सुरू झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन मंडळांत अतिवृष्टी
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अनेक भागात धुवाधार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाला होता. पिके ऊन धरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला, या पावसाने पिकांना दिलासा मिळाला. वसमत तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. वसमत मंडळात २४ तासांत सरासरी ७०.५ मिलीमीटर आणि टेंभुर्णी मंडळात ७०.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या दोन्ही मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली.
येलदरीत पाण्याची आवक
प्रकल्पातील पाण्यासाठयात लक्षणीय वाढ झाली. येलदरीत पाण्याची आवक झाली आहे. २४ तासांत २.८७ दलघमी पाण्याची या प्रकल्पात आवक झाली आहे. या प्रकल्पाच्या जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ४,२४,५१६ दलघमी एचडी असून, सध्या प्रकल्पात २,९९,८४६ दलघमी पाणीसाठा झाला आहे. ३७ टक्के जिवंत पाणीसाठा झाल्याने शेतीच्या सिंचनाची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
कोणत्या तालुक्यात किती टक्के पाऊस?
हिंगोली | ६३.४९ |
कळमनुरी | ६६.१९ |
वसमत | ५८.८३ |
औंढा | ६३.८१ |
सेनगाव | ६७.१७ |
एकूण | ६४.६१ |
लातुरात मात्र केवळ रिमझिम
लातूर शहरासह जिल्ह्यात शनिवारी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५६७.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या मघा नक्षत्र सुरू असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
परभणीच्या ७ मंडळांत अतिवृष्टी
आठवडाभरापासून सतत वातावरणात बदल होत आहे. सकाळी ऊन पडते तर दुपारी रिमझिम स्वरुपाचा पाऊस होत आहे. जिल्ह्यातील आठपैकी तावरजा आणि तिरू मध्यम प्रकल्पात अद्यापही उपयुक्त जलसाठा झाला नाही. देवार्जन आणि साकोळ मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा झाला आहे. मसलगा प्रकल्पात ८५६५ टक्के जलसाठा झाला आहे. पिकांपुरता पाऊस होत असल्याने प्रकल्पांत अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. देवाणीत रात्री मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात दोन मंडळांत अतिवृष्टी
धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. शनिवारी सकाळपर्यंत कळंब तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. यामध्ये कळंब व इटकून मंडळात अतिवृष्टी नोंदवण्यात आली.
तर सहा मंडळांमध्ये ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने जोर धरला. वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर तालुक्याच्या काही भागात काही मिनिटे जोरदार सरी कोसळल्या, यानंतर रिमझिम पाऊस सुरुच राहिला.
या पावसामुळे वाशी व कळंब तालुक्यातून वाहणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली. पारगाव नजीक नदीने पात्रही सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील स्मशानभूमीतही पाणी शिरले. मांजरा नदीतील पाण्याचा प्रवाह पाहता मांजरा धरणात पाण्याचा वेग वाढला असून, यामुळे पाणीसाठयात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात अकरा मंडळांमध्ये अतिवृष्टी
मागील २४ तासांत जिल्ह्यात बीड तालुक्यातील चार व पाच तालुक्यांतील प्रत्येकी एक व एका तालुक्यातील दोन अशा २२ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बीड तालुक्यातील बीड मंडळात ७० मिमी, पाली मंडळात ७५.३. नाळवंडी ७५.८ व लिंबागणेश मंडळात ७४.८ मिमी पाऊस झाला.
पाटोदा तालुक्यात पाटोदा मंडळात ७८.५ मिमी, गेवराई तालुक्यातील उमापूर मंडळात ७५.८ मिमी, माजलगावातील नित्रुड मंडळात ६७.५ व दिंव्दड मंडळात ७४.५. फैज तालुक्यातील बनसारोळा मंडळात ६७.३ मिमी, परळी तालुक्यातील परळी मंडळात ६५.३ आणि वडवणी तालुक्यातील कवडगाव मंडळात ६५ मिमी पाऊस झाला आहे.
या पावसाने सुखद धक्का दिला आहे. दरम्यान, परळी - बौद्ध रस्त्यावर वान नदीच्या पुलाचे काम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पांगरी येथील पर्यायी पूल शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी पहाटे परळी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
पर्यायी पुलाचे काम होईपर्यंत परळीच्या प्रवाशांनी अंबाजोगाई-मांजरसुंबा मार्गे बीड असा प्रवास करण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. त्यामुळे वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. चालू वर्षांत आतापर्यंत जिल्ह्यात ९४.६ टक्के पाऊस झाला आहे.