उन्हाच्या चटक्यासह मराठवाडापाणीटंचाईच्या झळांनी हैराण झाला आहे. मराठवाड्यातील एकूण ९२० लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता केवळ ९.६३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षी हाच साठा ३९.३३ टक्के एवढा होता.
जलसंपदा विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मराठवाडा विभागात आज ६९९.३० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात आता ५.६५ टक्के पाणीसाठा उरला आहे.
हिंगोलीमधील सर्वाधिक क्षमतेचे सिद्धेश्वर धरण शुन्यावर जाऊन पोहोचले आहे. तर येलदरी धरणातही आता २८.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धाराशिव जिल्ह्याची तहान भागावणारी बहुतांश धरणे आता शुन्यावर पोहोचली आहेत. लातूरमध्ये अशीच अवस्था असून टँकरने पाणीपुरवठा वाढला आहे. परभणीचे निम्न दुधना धरणही शुन्यावर गेले आहे.
राज्यात मराठवाडा विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असून मराठवाड्यानंतर पुणे, नाशिक कोकण विभागाचा धरणसाठा वेगाने कमी होत आहे. मान्सून राज्यात दाखल होण्यास अजून १५ दिवस शिल्लक असताना धरणसाठा वेगाने कमी होत आहे.