मराठवाडयात दिनांक 30 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्हयात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, दिनांक 01 ते 4 जूलै दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 30 जून ते 06 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व दिनांक 07 ते 13 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. सध्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे.