Marathwada Rain Update : सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Monsoon Rain) हजेरी लावली असून अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील काही भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र अद्यापही सर्व जिल्ह्याना जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा आहे. त्यातच मराठवाड्यात अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवस देखील तुरळक पावसाचीच शक्यता असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
मराठवाड्यात पाऊस कधी?
मराठवाड्यात (Marathwada Rain) धूळ वा पुरेशा ओलीवरील पेर पिकांना जून शेवट आठवड्यातील, किरकोळ ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा वाटत असला तरी, अजुन शेतकऱ्यांमध्ये तेथे चांगल्या पावसाची प्रतिक्षा ही कायम आहे. पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ४ जुलैपर्यंत पावसाच्या सद्य:स्थितीत विशेष काही बदल जाणवत नसुन, मराठवाड्यात अजूनही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते.
उत्तर व मध्य महाराष्ट्र :
खान्देशपासून सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात, जून शेवटच्या आठवड्यात, भाग बदलत मध्यम पावसाने हजेरी लावली. परंतु खरीप पेर हंगाम स्थिती येथेही समाधानकारक नसून जोरदार पावसाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ४ जुलैपर्यंत येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खान्देश ३ जिल्हे व पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
कोकण व विदर्भ :
जून शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात जोरदार तर विदर्भात पूर्वानुमनानुसार मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील पेर पिकांना जीवदान तर नापेर क्षेत्रात पेरीसाठी या पावसाने मदत होवु शकते, असे वाटते. पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. ४ जुलैपर्यंत पावसाची स्थिती अशीच म्हणजे कोकणात अति-जोरदार तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर मध्ये अति जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
संकलन :
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.