राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीची चाहूल लागत असताना कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे.
नुकतेच येऊन गेलेल्या 'तेज' चक्रीवादळानंतर श्रीलंका तसेच बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या दाबाचा प्रभाव राज्यावर होत असून आज आणि उद्या म्हणजेच ३० व ३१ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाट होऊन पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भ, खान्देशात आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने घट होऊन किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यांत मागील दोन दिवसातील तापमान १० ते १५ अंशांपर्यंत घसरले आहे. हिमालयाच्या कुशीत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातदेखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. कोरड्या हवामानामुळे राज्यात तापमानाचा पारा घसरत असून १५ नोव्हेंबरच्या पुढे थंडी वाढेल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.